Friday, March 14, 2008

सत्य आणि वास्तव ( truth and reality )

( रिकार्ड डॉकिन्स लिखीत द गॉड डिल्युजन पुस्तकातील एका परिच्छेदाचा स्वैर अनुवाद )

( आमचे निरिश्वरवादी मित्रवर्य श्री. स्टेफेन हॉग ज्यांनी बरोबर १ वर्षापूर्वी आमची ह्या पुस्तकाशी ओळख करून दिली त्या बद्दल त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करीत हा अनुवाद करत आहे )

विज्ञानाने आपल्याला शिकवलं आहे की, आपल्याला जरी जाणवत नसलं तरी, स्फटीक किंवा दगडांसारखे घन पदार्थ हे एकमेकांना चिकटलेल्या, परंतू एकमेकांपासून काहीशा अंतरावर असलेल्या अणूरेणूंपासून बनलेले असतात. असे हे अणू एकमेकांपासून किती अंतरावर असतील ह्याची कल्पना करायची झाली तर दोन एकमेकांना चिकटलेली गोल आकाराची खेळाची मैदाने डोळ्यासमोर आणा. आता प्रत्येक मैदानाच्या मध्यावर एक एक माशी बसली आहे असे गृहीत धरा. अतिसूक्ष्म आकारात, जर एक अणू एका माशी एवढा असेल तर दूसरा त्याच्या पासून दोन मैदानांच्या एकूण त्रिज्ये इतका असेल. मग जर एवढ्या अंतरावर असलेल्या अणूंपासून दगड बनलेले असतात, तर आपल्या हातांना ते इतके टणक आणि अभेद्य का भासतात?

एक जीव-शास्त्रज्ञ म्हणून ह्या प्रश्नाचे उत्तर मी असे देईनः आपले मेंदू अशा प्रकारे विकसीत (evolve) झाले आहेत की आपली शरीरे केवळ त्याच गोष्टी जाणून घेऊ शकतात की ज्या आपण अनुभवतो आणि जाणून घेऊ शकतो. आपली शरीरे सुद्धा दगडांप्रमाणेच अणूरेणूंची बनलेली आहेत. परंतू एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जातांना आपण एक पूर्ण शरीर म्हणून जातो. एकावेळी शरीरातला एक अणू पुढे पाठवू असा आपण कधी विचारच केलेला नसतो. आपला हात एखाद्या दगडातून आरपार जाऊ शकत नाही. पण तो जाऊ शकत नाही ह्याचं कारण हे नाहीये की दगडाचे अणू एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? त्याचं कारण हे आहे की, दगडाच्या त्या दोन अणूंमधे किती आकर्षण शक्ती आहे. आपल्या मेंदू करिता घन पदार्थ किंवा अभेद्यता असे समज करून घेणं सोप्प आहे म्हणून आपण तसे समज करून घेतले आहेत; आणि तसतसे आपले मेंदू विकसीत झाले आहेत. म्हणून साधारण पणे ज्यातून आपण आरपार जाऊ शकत नाही ते घन आणि जाऊ शकतो ते वायू असा समज आपण करून घेतला आहे. खरंतर घन आणि वायू असं काहिही नाहीये.

ह्याच मुद्द्याला धरून एक गोष्ट सांगतो जी मी जॉन रॉन्सनच्या ' द मेन हू स्टेअर ऍट गोट्स ' ह्या पुस्तकातून घेतली आहे :
१९८३ च्या उन्हाळ्यात घडलेली ही एक सत्य कथा आहे. अमेरिकन गुप्तहेर संघटनेचे प्रमुख मेजर जनरल अल्बर्ट स्टबलबाईन आपल्या आर्लिंग्टन व्हर्जीनियातील कार्यालयात बसले होते. बसल्या बसल्या ते एकटक समोरच्या भिंतीवर लावलेल्या मानपत्रे आणि पारितोषीकांकडे बघत होते. पारितोषीकांनी भरलेली ती भिंत १६००० सैनिक हाताखाली असलेल्या मेजर साहेबांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी करिअरची साक्ष देत होते. जरावेळाने पारितोषीके लावलेल्या भिंतीवर त्यांची दृष्टी स्थिर झाली. अचानक त्यांच्या मनात असा विचार आला की आपण पलीकडच्या खोलीत जावं. म्हणून ते उठले आणि पुढे चालू लागले. त्यांनी विचार केला की अणू (ऍटम्स) कशापासून बनलेले असतात? तर अंतराळापासून ( स्पेस ). मग त्यांनी विचार केला मी कशापासून बनलोय? तर अणूंपासून आणि भिंत? ती सुद्धा अणूंपासून, मग मला काय करायचयं तर एका अंतराळाला दुसर्‍यात मिसळतं जायचयं. म्हणजे मी नक्कीच भिंतीच्या पलीकडे जाऊ शकतो. अर्थातच मेजर साहेब, भिंतीवर जाऊन धडकले.

मेजर जनरल अल्बर्ट स्टबलबाईन हे चौकटीबाहेर जाऊन विचार करणारे (out of the box thinker) म्हणून प्रसिद्ध होते. आपण सामान्यपणे विचार केला असता की माणसा सारखी एखादी वस्तू जेव्हा चालत चालत भिंतीसारख्या वस्तूच्या पलीकडे जायचा प्रयत्न करेल तेव्हा ती भिंतीला धडकून थांबवली जाईल. न्यूट्रीनो सारखे प्रकाशाच्या वेगाने जाणारे विद्युतभार रहीत कण भिंतीच्या आरपार जाऊ शकतील असा विचार करण्याइतपत आपले मेंदू विकसीतच झालेले नसतात.

पक्ष्याचे पिस आणि लोखंडाचा गोळा हवेचा प्रतिरोध नसलेल्या जागेत एकाच उंचीवरून एकाच वेळी खाली टाकल्यास दोघे जमिनीवर एकत्रच पोचतील ह्या गॅलिलीओच्या सिद्धांताला आपण सहज स्विकारलं नाही. पक्ष्याच्या पिसाला होणारा हवेचा विरोध न कळत आपण नेहेमीच अनुभवला आहे. ह्या उलट जर आपण निर्वात पोकळीत (vacuum) जगत आपले मेंदू विकसीत झाले असते तर ' पक्ष्याचे पिस आणि लोखंडाचा गोळा हवेचा प्रतिरोध असलेल्या जागेत एकाच उंचीवरून एकाच वेळी खाली टाकल्यास दोघे जमिनीवर एकत्र पोचणारच नाहीत ' हे आपण सहज स्विकारलं नसतं.

0 comments: