काल एक बुल्गेरियन मित्र, दिमित्रीकडे जेवायला गेलेलो. त्याचे वडील बुल्गेरियातून आलेले. दिमित्री जेव्हा एम. एस. करत होता तेव्हा मी त्याला अभ्यासात, नोकरीच्या ठिकाणी, प्रोग्रॅमींग करायला वैगेरे मदत करायचो. त्यामुळे दिमित्री जेव्हा बुल्गेरियाला घरी फोन करायचा तेव्हा तो माझ्याबद्दल बोलत असावा. त्यामुळे त्याचा वडीलांना मला भेटायचं होतं. त्यांनी मला आग्रह करून बोलवलेलं. खरं त्यांनी परवा बोलवलेलं पण त्या दिवशी नेमकं दिमित्रीला उशीरा पर्यंत काम होतं त्यामुळे मी गेलो नाही. काल शेवटी गेलो. काहीतरी बरोबर न्यायचं म्हणून एक वाईनची बाटली घेउन गेलेलो. दिमित्रीच्या वडिलांना पाहिल्यावर मी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला आणि म्हटलं हॅलो, हाऊ आर यू डूईंग? तर हा माणूस राईचो अस पुटपुटला. तर दिमित्री हसायला लागला, कारण फक्त त्यालाच झालेला विनोद कळला होता. दिमित्रीच्या वडिलांना इंग्लिश येत नाही, माझ्या हाऊ आर यू डूईंग? ह्या प्रश्नाच उत्तर त्यांनी मी राईचो आहे अस दिल होतं. मग हा प्रकार दिमित्रीनी मला इंग्लिश आणि राईचोला बुल्गेरियन मधे सांगितल्यावर आम्ही सुद्धा हसायला लागलो.
बुल्गेरिया हा ग्रिस, टर्की, मेसेडोनिया, सर्बिया, रोमानिया ह्यांचा शेजारी. म्हणायला बुल्गारियाला समुद्र किनारा आहे पण तो समुद्र स्वतःच लँडलॉक्ड आहे त्यामुळे बुल्गारिया आपोआप लँडलॉक्ड झाला आहे. शीतयुद्धाचा काळात बुल्गेरिया इस्टर्नब्लॉकमधे ( म्हणजे कम्युनिस्ट, रशियाच्या प्रभावाखालील ) होता. परंतु १९९२ पासून परिस्थिती बदलली. आता बुल्गेरिया युरोपियन युनियनचा भाग आहे. तेथील जागेच्या, वस्तूंच्या किमती, लोकांचे पगार हळूहळू जागतीक स्थरावरील किमतीस जुळणारे होत आहेत, त्यामुळे भारताप्रमाणेच बुल्गेरियाच्या इतिहासाच पान पलटतयं आणि सामान्य बुल्गेरियन जनता खुल्या अर्थव्यवस्थेला सामोरी जात आहे. आपल्याकडे जसा लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार, सरकारी अडेलतट्टूपणा, बदलास होणारा विरोध वैगेरे जसे प्रश्न आहेत तसे बुल्गेरियात सुद्धा आहेत.
तेथील मागच्या पिढ्या आणि आजच्या पिढ्या ह्यात प्रचंड तफावत आहे. जुनी पिढी, साखर संपली तर शेजारी जाऊन मागणारी आहे, नव्या पिढीला शेजारी कोण रहातं ते माहिती नाही. एख्याद्या बुल्गेरियन आम-आदमीला ज्या भाषा बोलता येतात त्या म्हणजे बुल्गारियन, मेसेडोनियन आणि रशियन; सर्बियन समजते पण बोलता येत नाही. मेसेडोनियन बोलता येते कारण ती बुल्गेरियन सारखी आहे. रशियन बोलता येते कारण शाळेत दुसरी भाषा म्हणून शिकवली जाते. ऐकेकाळी रशिया हाच बुल्गेरियाकरिता एकमेव ग्राहक होता. माझा मित्र दिमित्री म्हणतो की ऑल बुल्गेरियन्स युज्ड टू डू बिफोर इज मेक व्होड्का, ऍज मच वी मेक, ऍज मच रशियन्स ड्रींक. ह्यावरून त्या देशाच्या आयसोलेशनची कल्पना यावी. आता तेथील लोक बाहेर पडत आहेत. नव्या पिढीतील लोक इंग्लीश शिकत आहेत. शीतयुद्धानंतर अमेरिकेनी बुल्गारिया करिता ग्रिनकार्ड लॉटरी प्रकल्प खुला केला, त्यामु़ळे आज शिकागो मधे जवळ जवळ दिड-दोन लाख बुल्गेरियन्स आहेत. वर्षाला साधारण ७-८ हजार बुल्गारियन्स ग्रीनकार्ड लॉटरी घेऊन येतात. नंतर ते बुल्गारियातून लग्न करून अजून एखाद्या बुल्गारियनला आणतात. अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी खोटी लग्ने, कागदपत्रांत फेरफार वैगेरे प्रकार त्यांच्यात सर्रास आढळतात. भारतीय मुलगी अमेरिकेत असेल आणि तीने भारतात रहाणार्या मुलाशी लग्न करून त्याला भारतातून अमेरिकेत घेऊन आली आहे असली उदाहरणे विरळाच, ती सुद्धा कदाचीत गुजराथी-पंजाब्यात होत असतील. बुल्गारियन्स मधे असला न्युनगंड नाही. त्यांना उद्देश माहिती असतो, मला अजून एका बुल्गेरियनला अमेरिकेत आणयचयं बस्स, आणि ते त्या करता वाट्टेल ते करतात. जसे केरळी लोक, दुबईत एका खोलीत ७-८ रहातात अगदी तसेच बुल्गेरियन्स एकमेकांना मदत करतात. अर्थात, असा एकमेकां सहाय्य करू असा जरी भाव असला, तरी म्हणून संबंध मधूर असतीलच असे नाही. दोन बुल्गारिन्सला बोलतांना पाहीलं की असं वाटते की आता हे एकमेकांच्या नरडीचा घोट घेतील.
आपण जर एखाद्या बुल्गारियन समोर संस्कृतमध्ये १ ते १० पर्यंत आकडे मोजले, तर तो थक्क होतो, कारण त्यांचे आकड्यांचे उच्चार थेट संस्कृत मधल्यासारखे आहेत. दोनला द्वे म्हणतात, तीनला त्रे किंवा त्रेश, चारला चेर किंवा च्रेश, सहाला शेश, सातला सप्तह, दहाला देश. त्वा म्हणजे ते. को म्हणजे काय. पोलिश लोकांना ते पुलस्त्य म्हणतात. त्यांचे काही शब्द टर्कीतून आले आहेत जसे कारा म्हणजे काळा. गुफ्ते म्हणजे कोफ्ते, केबॉब्स म्हणजे कबाब, बक्षीश म्हणजे टीप्स. ( ह्यावरुन आठवलं स्पॅनिश लोक सापाला सर्प म्हणतात, पगाराला पगार, डोळ्यांना ओखोस. पगार हा शब्द मराठीत पोर्तुगीझ मधून आल्याचे मधे वाचले होते. ). मला हा सगळा सिल्करूट चा परिणाम वाटतो, ह्या खुश्कीच्या मार्गावरून नुसता बाजारमालच आला गेला नाही तर, भाषा, गणित, संस्कृति आणि आपल्या शरिरातल्या गुणसुत्रांची सुद्धा देवाणघेवाण होत राहिली. जिप्सि लोक हे मुळचे राजस्थानी. असो. भारतात आपल्याला काळ्या डोळ्यांपासून अगदी निळ्या डोळ्यांची सुद्धा माणसे दिसतात, हा योगायोग नाही. भारताला खरंतरं सर्वाधीक वांशीक सरमिसळीचा देश म्हणता येईल. स्पेननी मेक्सिकोवर वांशीक सरमिसळ लादली म्हणून मेक्सिकन्स म्हणतात की वी मेक्सिकन्स आर अ रिझल्ट ऑफ हंड्रेड्स ऑफ इयर्स ऑफ रेप.
बुल्गेरियन खायचे पदार्थ, थोड्याफार फरकानी ग्रीक सारखेच असतात. काल दिमित्रीकडे गेलेलो त्याच्या वडिलांनी चक्क चवळीची उसळ आणि भेंडी व वांग्याला डाळीचं पिठ लाऊन तळून झूकिनी तयार केली होती. मी त्याला म्हटलं की ह्यात थोडं मिठ आणि तिखट घातलं असतसं तर मी ह्याला भारतीय जेवण म्हटलं असतं. सॅलड बाकी भारी होतं, फेटा चिज, जबराच. बर मी जी वाईन घेऊन गेलो त्याबद्दल राईचो मला थँक्यू वैगेरे काही म्हणायच्या भानगडीत तर पडलाच नाही, उलट ती वाईन प्यायच्या ऐवजी शांतपणे त्यानी स्वतः घरी बुल्गेरियात तयार केलेली ६१% अल्कोहोल असलेली बुल्गेरियन देशी दारू काढली आणि शांतपणे पीत बसला. मी अवाक् झालो. दिमित्री म्हणाला, की हा बेवडा दुसरं काही पिऊ शकत नाही, स्वतःच स्वतः करता दारू तयार करतो आणि पितो. त्यानी मला आग्रह वैगेरे काही केला नाही, एकदा म्हणाला तू पण घे, मी म्हटलं नको, तर विषय बंद, नको तर नको. दारू सुद्धा नीट मारत होता, चकणा नावाला सुद्धा नाही. आणि दारू पितांना मी भल्या भल्याचे चेहेरे कडवट झालेले पाहीले आहेत. ह्या माणसाच्या चेहर्यावरची एकही रेष हालत नव्हती. पुढचे २ तास दिमित्री मला त्याचं आणि त्याला माझं बोलणं भाषांतर करून सांगत होता. गप्पा मारता मारताच, राईचो सोफ्यावर आडवा झाला, डेजर्ट, ज्यूस नाही, कपडे बदलणं, दात घासून मग झोपणं वैगेरे काही नाही, एकदम राकट, थेट मराठी लोकांसारखा.
( पोज् देतांना स्मितहास्य करायचा प्रयत्न करणारे दोन दगड: राईचो आणि लेखक )
दुसर्या दिवशी राईचो लवकर उठून ब्रेकफास्ट करता धावपळ करीत होता. ब्रेडला कसलं तरी पिठ लाउन तळलं होतं आणि कॉफी. ती आम्ही ढोसली. मोबाईल फोनवर फोटो वैगेरे काढले, आणि फोन वरुनच इंटरनेटवर अपलोड केले. राईचो कुतुहलानी हा प्रकार पहात होता. मोबाईल वरून फोटो इंटरनेटवर जात आहेत ह्यावर त्याचा विश्वास बसला नाही, दिमित्रीला म्हणाला की काँम्युटर सुरू करून दाखव की खरच अपलोड झाले आहेत का? जातांना मी राईचोला म्हटलं की आय ऍम कॅरींग गुड मेमोरिज अबाऊट बुल्गारिया विथ मी. तर म्हणतो, "मी अजून २ महीने इथे आहे, परत ये, आय विल हेल्प यू कॅरी व्हेरीएशन ऑफ दोज मेमोरीज". दिमित्रीनी पुन्हा अनुवाद केला आणि पुन्हा एकदा उशीरा जोक कळल्यावर जश्या चेहर्यानी लेट करंट लोक असतात तसे आम्ही हसलो.


0 comments:
Post a Comment