Monday, June 16, 2008
माझी साक्षात्कारी मधुमेहाची भीती
तर झालं अस की एकदा काही मित्रांबरोबर एका छोट्या टेकडीवर भटकंतीला गेलो होतो, तिकडे बरचं चालून झाल्यावर, अमंळ श्वास टाकावा म्हणून आम्ही जरा गवतावर बसलो. मी पायातले बूटमोजे काढले आणि पसरलो. बरोबरीच्या चमूतली एक मुलगी तेव्हढ्यात मला म्हणाली ' यू आर स्विट ' . सुरवातीला मी थक्क झालो, मग जरा लाजल्यासारखा झालो, पण मग जरा सावरून तिच्या डोळ्यात पाहू लागलो, तर तिने माझ्यापायावर चढलेल्या मुग्यांकडे कटाक्ष टाकतं, भुवई उंचावली. बघीतलं तर जवळच्या वारूळातल्या काही मुंग्या माझ्या घामेजलेल्या पायावर चढलेल्या होत्या. ( हात् तिच्या, म्हणजे आम्ही तसे स्विट होतो काय? ) त्यावरून मला एकदा एका ठिकाणी वाचलेली बातमी आठवली की एका व्यक्तीने लघुशंका केल्यानंतर लागलेल्या मुंग्यांवरून त्या व्यक्तीस मधुमेह असल्याचं लक्षात आलेलं. घाम काय आणि लघूशंकोत्पन्न द्रव्य काय दोन्ही बॉडी वेस्टच, म्हणून, मला शुगर आहे की काय ह्या भीतीने माझ्या मनाला घेरायला सुरवात केली. अर्थातच, त्यानंतर मी आपोआप मी किती साखर खातो आहे त्याकडे माझं लक्ष जायला लागलं. रोज दूध, चहा, कॉफी मधे २-३ चमचे साखर, रोजच्या जेवणात ज्यूस नाहीतर कोक वैगेरे, नंतर काहीतरी गोड, रात्री जमल्यास आईस्क्रिम किंवा केक, काही नाहीतर कोल्ड कॉफी, चॉकोलेट्स. थोडक्यात काय तर मी फूल्-टू ऐश करतो आहे हे २-४ दिवसांत जाणवलं. पुढे मी नोकरी बदलली, आधीच्या कंपनी मधे कार पार्क जवळ होतं, नव्या कंपनी मधे जरा दूर आहे, शिवाय ऑफीस इतकं मोठ्ठ आहे की बरच चालायला लागतं, जवळजवळ ५ मजले चढउतार होतो, त्यात लॅपटॉपच ओझं, एकूण काय की दमायला व्हायचं. आता एवढे सगळे सिम्टम्स आणि त्यात माझं खाणंपिणं ह्या भांडवलावर, मित्रमंडळी आणि माझं अंर्तमन, मला टेस्ट करून घे असं कानी कपाळी ओरडायला लागले. माझ्या बरोबर रहाणार्याला मधुमेह आहे, त्यामुळे, त्याच्या कडून मला सगळे टेक्निकल डिटेल्स कळायला लागले. सकाळी उपाशी पोटी किती असायला पाहीजे, जेवणानंतर किती वैगेरे वैगेरे ? त्याला २०० शुगर आहे त्यामुळे तो आकडा जणू माझा शत्रू झालेला. २०० च्या जवळपासचा कुठलाही आकडा ऐकला की मला मधूमेह आठवायला लागायचा. जगणं आणि खरं म्हणजे जेवणं अगदी दुश्वार झालेलं. त्या मित्राकडे शुगर टेस्ट करणारी २ यंत्रे होती. शुगर टेस्ट करणार्या यंत्राचे ३ भाग असतात: १) टाचणी - जी रक्त काढते, २ ) एक पट्टी ज्यावर रक्ताचा ठीपका ठेवायचा ३) यंत्र जे त्या रक्ताच्या ठिपक्यावरून शुकर किती ते दाखवतं. आता ह्याच्या कडे असलेल्या २ यंत्रांपैकी १ बिघडलेलं, दुसरं सुरू होतं पण त्याच्या पट्ट्या संपलेल्या. पहिल्याच्या पट्ट्या दुसर्याला चालतील असं वाटून मित्राने माझ्या ४-५ बोटातून रक्त काढलं पण सुरू असलेल्या यंत्राला त्याच्याच पट्ट्या हव्या होत्या. माझं रक्त फुकट गेलं आणि भीतीयुक्त उत्सुकता अजून वाढली. आता ह्या पट्ट्या बर्याच महाग असतात. कधी कधी असं होतं की इंटरनेटवर तुम्हाला पट्ट्यांपेक्षा यंत्र + पट्ट्या असं स्वस्त (क्वचित फुकट सुद्धा ) मिळतं. दुकानात जाऊन पट्ट्या आणणार होतो, पण मित्राला मेल्-इन्-रिबेट वालं डील मिळालं त्यामुळे यंत्र+पट्ट्या फुकट मिळाल्या. पण यंत्र यायला १५ दिवस लागले, त्यात तो बाहेरगावी गेला. दरम्यानच्या काळात माझ्या मनात एक सुप्त बैचेनी होती की काय होईल.
शेवटी आज तो दिवस उजाडला. आणि सकाळी पहिलं टेस्टींग केलं. उपाशी पोटी ९८ आणि भरल्या पोटी १२६ असं रिडींग आलं. जे अगदी सामान्य आहे. पहिलं रिडींग ९८ आल्यामुळे, मधल्या जेवणात मी भरपूर गोड खाल्लं. खाण्यापिण्याच्या वेळी चेहर्यावर असणारी ती बेफिक्री, चटावलेली जीभ, मेनूकार्डावरुन हे खाऊ की ते खाऊ असा विचार करत भिरभिरणारी नजर हे काही महीने मी फार मिस् करत होतो. आता पुन्हा एकदा, जसा एखादा वळू सुटतो, किंवा एखादा ट्रकवाला सगळा रस्ता आपल्याच बा चा आहे असा ट्रक चालवतो, किंवा एखादा हत्ती उसाच्या शेतात घुसतो, तसा मी रेस्टांरट्स, डायनिंग हॉल्स मधे शिरणार........ लक्ष्मणराव म्हणतात त्याप्रमाणे ' द होल वावर इस अवर' .... मायाबाझार ह्या तेलुगू चित्रपटातील हे गीत माझ्या आवडीच आहे आणि खाण्यापिण्याशी संबधीत आहे म्हणून येथे देत आहे...
Wednesday, April 23, 2008
कब से हुं क्या बताऊं जहान्-ए-खराब में
वली असदुल्ला खां गालिब साहेबांच्या एका गझलेचा अनुवाद पेश करतो आहे...
कासिद के आते आते, खत एक और लिख रखूं
मै जानता हुं जो वो लिखेंगे जवाब में
अर्थः
दूत ( निरोप्या, पोस्टमन ) माझ्या पत्राचं उत्तर तिच्याकडून आणेस्तोवर मी अजून एक पत्र लिहून ठेवतो
कारण मला माहिती आहे ती काय उत्तर देणार आहे.
कब से हुं क्या बताऊं जहान्-ए-खराब में
शब आये, हिज्र को भी रखूं गर हिसाब में
अर्थः
ह्या निर्दयी जगात मी कधी पासून आहे काय सांगू ( तुम्हाला मित्रहो )
जर विरहाचे क्षण धरून सांगायच म्हटलं तर सगळ्या कालावधीचं गणित सुटायला पहाट होईल.
शब = पहाटेच्याही आधिची वेळ, साधारणपणे मध्यरात्र आणि ब्रह्ममुहूर्त च्या मधली वेळ
( त्यावरून आठवलं शम्मी कपूरच्या एका गाण्यात " ऐसी नाजूक हो वो जिसका शबनम मुंह धोती हो " अशी ओळ आहे, ती शबनम म्हणजे पहाटेचे पाना-फूलांवरचे दव. शब = पहाट, नम = थेंब, नमी = ओलावा )
हिज्र = विरहाचे क्षण ( सहसा, विरहाच्या रात्री )
मुझ तक कब उनके बज्म में आता था दौर्-ए-जाम
साकी ने कुछ मिला न दिया हो शराब में
अर्थः
तिच्या त्या मैफीलीत मद्याचा चषक कधी भरला जात होता ( आणि कधी संपत होता ) ते मला कळतं नव्हतं
बहूदा दारू मधे अजूनही काही तिने मिसळलेलं असणार
बज्म = शेरोशायरी + दारूची मैफील
साकी = पेल्यात दारू ओतणारी
ता फिर ना इंतजार में नींद आये उम्रभर
आने का अहेद कर गये आये जो ख्वाबमें
अर्थ (दुसर्या ओळीचा आधी)
स्वप्नात दिलेलं वचन की येऊन भेटेन ( त्यावर काय विश्वास ठेवायचा खरं तर? )
(पण तरी) आता मी वाट पहात राहीन आणि ( ती आली नाही तर) मला आयुष्यभर झोप येणार नाही
अहेद = वचन
गालिब छुटी शराब पर अब भी कभी-कभी
पिता हुं रोज्-ए-अब्र-ओ-शब्-ए-माहताब में
अर्थ
दारू पिणं मी सोडलं तर आहे, पण तरी,
एखाद्या, पावसाळी दिवशी, चांदण्या-रात्री, (एखाद-दोन घोट) घेतोच
अब्र = ढग, अभ्र, मेघ
रोज = दिवस
रोज्-ए-अब्र = ढगाळ, पावसाळी दिवस ( बेसिकली अशी वेळ जेव्हा मला कांदा भजी आणि वाफाळणारा चहा हवाहवासा वाटतो )
माहताब = चंद्र
शब्-ए-माहताब = चांदणी रात्र / पहाट
Sunday, April 13, 2008
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा


मित्रहो,
आज रामनवमी आहे; समर्थांची जयंती सुद्धा नवमीचीच आहे.
समर्थांनीं साध्या मराठीत विपुल ग्रंथरचना करून सकळ जनांवर कृपा केली आहे. ज्ञानेश्वर कालीन मराठीपेक्षा समर्थकालीन मराठी आधुनीक असल्याने समजावयांस सोपी आहे. मनाचे श्लोक, भिमरूपी, दासबोध आणि रोज म्हटल्या जाणर्या बर्याच आरत्या समर्थांनी लिहील्या आहेत.
[ या पुढील भाग आनंदी, समाधानी किंवा अध्यात्माची भिती बाळगणार्यांनी कृपया वाचू नये. तसे केल्यास आपण चिंताग्रस्त होऊन आपले माझ्याबद्दलचे मत कलुषीत होण्याची शक्यता आहे. :) ]
हल्ली एका द्वैतवादी मित्राशी आमची द्वैताद्वैतावर चर्चा घडते आहे. ईश्वर (ब्रह्म) आणि ईश्वरांश (माया, चराचरसृष्टी) दोन्हीही सत्य अशी आमुची भूमिका आहे, परंतू असे असतांही द्वैतवाद्यांचा अद्वैतास विरोध आणि अद्वैतवाद्यांचा द्वैतास विरोध हा अज्ञानमूलक असल्याचे आमचे मत आहे. असो, तर मुद्दा असा की समर्थांनी वरील वांङमया खेरीज आत्माराम नामक अजून एक अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ लिहून ठेवला आहे.
ह्या ग्रंथात समर्थांनी माया आणि ब्रह्मावर निरूपण केले आहे आणि शेवटी स्वानुभव सांगितला आहे. द्वैत-अद्वैतावर चर्चा करतांना दोन्ही पक्ष शब्दच्छल करत करत शेवटी एकमेकांचे शत्रू होण्याच्या मार्गानी जाणे हा शिरस्ता आहे. समर्थांनी मात्र माया आणि ब्रम्ह ह्या दोन्हीवर अत्यंत संतुलीत लेखन केले आहे. मायेचे महत्त्व सांगताना समर्थ म्हणतातः
माया ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान
माया ध्याता, ध्येय, ध्यान
माया हेची समाधान योगियांचे
मायेकरिता देव आणि भक्त
मायेकरिता ज्ञाते विरक्त
मायेकरिता वेदश्रुती
मायेकरिता नाना वित्पत्ती
मायेकरिता होती मूढ ते विवेकी
मायेविण ज्ञान कैचे
माया जीवन सकळ जनांचे
मायेविण साधकांचे कार्य न चले
माया योगियांची माउली
जेथील तेथे नेऊन घाली
ब्रम्हनिरुपणात समर्थ म्हणतातः
माया तोडिता अधिक जडे
म्हणोनी धरती ते वेडे
धरिता सोडिता ते नातुडे
वर्म कळल्यांवाचूनी
जैसे चक्रविहूचे उगवणे
बाहेर येऊनी आत जाणे
का भीतरी जाऊन येणे अकस्मात बाहेरी
बहू नाटकी हे माया, मी पण न जाये विलया
विवेकी पाहतां देही या ठावोचि नाही
येकी अनेक आटले, येकपण अनेकांसवे गेले
उपरी जे नि:संग उरले तेंचि स्वरूप तुझे
तुझे स्वरूप तुजची न कळे.
द्वैतवादी भारतीय तत्वज्ञानाचा केवळ पूर्वार्ध तर अद्वैतवादी केवळ उत्तरार्ध वाचतात असे आम्हांस वाटते.
असो, समर्थांच्या शब्दांत आत्माराम जाणून घेण्याचे कारण इतकेच की "जेणे भिन्नत्वाचा भ्रम तुटोनी जाये"
Saturday, April 5, 2008
Saturday, March 29, 2008
Thickness/Thinness of a flame
I have been having this question since last 2 days.
Question is: How to measure width/breadth/thickness/thinness of a flame? I am devastated; not finding any satisfactory answer. If you have any convincing answer, please let me know, I will buy you lunch. ( No, philosophical answers please, this is a physics question. )
Thanks.
मित्रहो,
दिव्याच्या ज्योतीची जाडी कशी मोजायची ? असा घनघोर प्रश्न आम्हांस २ दिवसांपासून पडला आहे. जो कोणी ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देईल त्यांस अर्धे राज्य आणि पूर्ण राजकन्या (आवड वेगळी असल्यास राजकुमार) देण्यात येईल. ( हा प्रश्न तत्त्वज्ञानाशी संबंधीत नसून भौतिकशास्त्राशी संबधीत आहे तेव्हा कृपया अध्यात्मातून अधिभौतिकात येऊन उत्तर द्यावे. ज्योती दिवे अशा मुलीच्या नावावरून विनोद लगेच तुमच्या मनात येतीलच, परंतू त्या प्रकारच्या उत्तरांत अस्मादिकांस सध्या रस नाही. )
आपला,
प्रश्नांकीत
Thursday, March 27, 2008
बुर्गास इ इंडीस्
काल एक बुल्गेरियन मित्र, दिमित्रीकडे जेवायला गेलेलो. त्याचे वडील बुल्गेरियातून आलेले. दिमित्री जेव्हा एम. एस. करत होता तेव्हा मी त्याला अभ्यासात, नोकरीच्या ठिकाणी, प्रोग्रॅमींग करायला वैगेरे मदत करायचो. त्यामुळे दिमित्री जेव्हा बुल्गेरियाला घरी फोन करायचा तेव्हा तो माझ्याबद्दल बोलत असावा. त्यामुळे त्याचा वडीलांना मला भेटायचं होतं. त्यांनी मला आग्रह करून बोलवलेलं. खरं त्यांनी परवा बोलवलेलं पण त्या दिवशी नेमकं दिमित्रीला उशीरा पर्यंत काम होतं त्यामुळे मी गेलो नाही. काल शेवटी गेलो. काहीतरी बरोबर न्यायचं म्हणून एक वाईनची बाटली घेउन गेलेलो. दिमित्रीच्या वडिलांना पाहिल्यावर मी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला आणि म्हटलं हॅलो, हाऊ आर यू डूईंग? तर हा माणूस राईचो अस पुटपुटला. तर दिमित्री हसायला लागला, कारण फक्त त्यालाच झालेला विनोद कळला होता. दिमित्रीच्या वडिलांना इंग्लिश येत नाही, माझ्या हाऊ आर यू डूईंग? ह्या प्रश्नाच उत्तर त्यांनी मी राईचो आहे अस दिल होतं. मग हा प्रकार दिमित्रीनी मला इंग्लिश आणि राईचोला बुल्गेरियन मधे सांगितल्यावर आम्ही सुद्धा हसायला लागलो.
बुल्गेरिया हा ग्रिस, टर्की, मेसेडोनिया, सर्बिया, रोमानिया ह्यांचा शेजारी. म्हणायला बुल्गारियाला समुद्र किनारा आहे पण तो समुद्र स्वतःच लँडलॉक्ड आहे त्यामुळे बुल्गारिया आपोआप लँडलॉक्ड झाला आहे. शीतयुद्धाचा काळात बुल्गेरिया इस्टर्नब्लॉकमधे ( म्हणजे कम्युनिस्ट, रशियाच्या प्रभावाखालील ) होता. परंतु १९९२ पासून परिस्थिती बदलली. आता बुल्गेरिया युरोपियन युनियनचा भाग आहे. तेथील जागेच्या, वस्तूंच्या किमती, लोकांचे पगार हळूहळू जागतीक स्थरावरील किमतीस जुळणारे होत आहेत, त्यामुळे भारताप्रमाणेच बुल्गेरियाच्या इतिहासाच पान पलटतयं आणि सामान्य बुल्गेरियन जनता खुल्या अर्थव्यवस्थेला सामोरी जात आहे. आपल्याकडे जसा लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार, सरकारी अडेलतट्टूपणा, बदलास होणारा विरोध वैगेरे जसे प्रश्न आहेत तसे बुल्गेरियात सुद्धा आहेत.
तेथील मागच्या पिढ्या आणि आजच्या पिढ्या ह्यात प्रचंड तफावत आहे. जुनी पिढी, साखर संपली तर शेजारी जाऊन मागणारी आहे, नव्या पिढीला शेजारी कोण रहातं ते माहिती नाही. एख्याद्या बुल्गेरियन आम-आदमीला ज्या भाषा बोलता येतात त्या म्हणजे बुल्गारियन, मेसेडोनियन आणि रशियन; सर्बियन समजते पण बोलता येत नाही. मेसेडोनियन बोलता येते कारण ती बुल्गेरियन सारखी आहे. रशियन बोलता येते कारण शाळेत दुसरी भाषा म्हणून शिकवली जाते. ऐकेकाळी रशिया हाच बुल्गेरियाकरिता एकमेव ग्राहक होता. माझा मित्र दिमित्री म्हणतो की ऑल बुल्गेरियन्स युज्ड टू डू बिफोर इज मेक व्होड्का, ऍज मच वी मेक, ऍज मच रशियन्स ड्रींक. ह्यावरून त्या देशाच्या आयसोलेशनची कल्पना यावी. आता तेथील लोक बाहेर पडत आहेत. नव्या पिढीतील लोक इंग्लीश शिकत आहेत. शीतयुद्धानंतर अमेरिकेनी बुल्गारिया करिता ग्रिनकार्ड लॉटरी प्रकल्प खुला केला, त्यामु़ळे आज शिकागो मधे जवळ जवळ दिड-दोन लाख बुल्गेरियन्स आहेत. वर्षाला साधारण ७-८ हजार बुल्गारियन्स ग्रीनकार्ड लॉटरी घेऊन येतात. नंतर ते बुल्गारियातून लग्न करून अजून एखाद्या बुल्गारियनला आणतात. अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी खोटी लग्ने, कागदपत्रांत फेरफार वैगेरे प्रकार त्यांच्यात सर्रास आढळतात. भारतीय मुलगी अमेरिकेत असेल आणि तीने भारतात रहाणार्या मुलाशी लग्न करून त्याला भारतातून अमेरिकेत घेऊन आली आहे असली उदाहरणे विरळाच, ती सुद्धा कदाचीत गुजराथी-पंजाब्यात होत असतील. बुल्गारियन्स मधे असला न्युनगंड नाही. त्यांना उद्देश माहिती असतो, मला अजून एका बुल्गेरियनला अमेरिकेत आणयचयं बस्स, आणि ते त्या करता वाट्टेल ते करतात. जसे केरळी लोक, दुबईत एका खोलीत ७-८ रहातात अगदी तसेच बुल्गेरियन्स एकमेकांना मदत करतात. अर्थात, असा एकमेकां सहाय्य करू असा जरी भाव असला, तरी म्हणून संबंध मधूर असतीलच असे नाही. दोन बुल्गारिन्सला बोलतांना पाहीलं की असं वाटते की आता हे एकमेकांच्या नरडीचा घोट घेतील.
आपण जर एखाद्या बुल्गारियन समोर संस्कृतमध्ये १ ते १० पर्यंत आकडे मोजले, तर तो थक्क होतो, कारण त्यांचे आकड्यांचे उच्चार थेट संस्कृत मधल्यासारखे आहेत. दोनला द्वे म्हणतात, तीनला त्रे किंवा त्रेश, चारला चेर किंवा च्रेश, सहाला शेश, सातला सप्तह, दहाला देश. त्वा म्हणजे ते. को म्हणजे काय. पोलिश लोकांना ते पुलस्त्य म्हणतात. त्यांचे काही शब्द टर्कीतून आले आहेत जसे कारा म्हणजे काळा. गुफ्ते म्हणजे कोफ्ते, केबॉब्स म्हणजे कबाब, बक्षीश म्हणजे टीप्स. ( ह्यावरुन आठवलं स्पॅनिश लोक सापाला सर्प म्हणतात, पगाराला पगार, डोळ्यांना ओखोस. पगार हा शब्द मराठीत पोर्तुगीझ मधून आल्याचे मधे वाचले होते. ). मला हा सगळा सिल्करूट चा परिणाम वाटतो, ह्या खुश्कीच्या मार्गावरून नुसता बाजारमालच आला गेला नाही तर, भाषा, गणित, संस्कृति आणि आपल्या शरिरातल्या गुणसुत्रांची सुद्धा देवाणघेवाण होत राहिली. जिप्सि लोक हे मुळचे राजस्थानी. असो. भारतात आपल्याला काळ्या डोळ्यांपासून अगदी निळ्या डोळ्यांची सुद्धा माणसे दिसतात, हा योगायोग नाही. भारताला खरंतरं सर्वाधीक वांशीक सरमिसळीचा देश म्हणता येईल. स्पेननी मेक्सिकोवर वांशीक सरमिसळ लादली म्हणून मेक्सिकन्स म्हणतात की वी मेक्सिकन्स आर अ रिझल्ट ऑफ हंड्रेड्स ऑफ इयर्स ऑफ रेप.
बुल्गेरियन खायचे पदार्थ, थोड्याफार फरकानी ग्रीक सारखेच असतात. काल दिमित्रीकडे गेलेलो त्याच्या वडिलांनी चक्क चवळीची उसळ आणि भेंडी व वांग्याला डाळीचं पिठ लाऊन तळून झूकिनी तयार केली होती. मी त्याला म्हटलं की ह्यात थोडं मिठ आणि तिखट घातलं असतसं तर मी ह्याला भारतीय जेवण म्हटलं असतं. सॅलड बाकी भारी होतं, फेटा चिज, जबराच. बर मी जी वाईन घेऊन गेलो त्याबद्दल राईचो मला थँक्यू वैगेरे काही म्हणायच्या भानगडीत तर पडलाच नाही, उलट ती वाईन प्यायच्या ऐवजी शांतपणे त्यानी स्वतः घरी बुल्गेरियात तयार केलेली ६१% अल्कोहोल असलेली बुल्गेरियन देशी दारू काढली आणि शांतपणे पीत बसला. मी अवाक् झालो. दिमित्री म्हणाला, की हा बेवडा दुसरं काही पिऊ शकत नाही, स्वतःच स्वतः करता दारू तयार करतो आणि पितो. त्यानी मला आग्रह वैगेरे काही केला नाही, एकदा म्हणाला तू पण घे, मी म्हटलं नको, तर विषय बंद, नको तर नको. दारू सुद्धा नीट मारत होता, चकणा नावाला सुद्धा नाही. आणि दारू पितांना मी भल्या भल्याचे चेहेरे कडवट झालेले पाहीले आहेत. ह्या माणसाच्या चेहर्यावरची एकही रेष हालत नव्हती. पुढचे २ तास दिमित्री मला त्याचं आणि त्याला माझं बोलणं भाषांतर करून सांगत होता. गप्पा मारता मारताच, राईचो सोफ्यावर आडवा झाला, डेजर्ट, ज्यूस नाही, कपडे बदलणं, दात घासून मग झोपणं वैगेरे काही नाही, एकदम राकट, थेट मराठी लोकांसारखा.
( पोज् देतांना स्मितहास्य करायचा प्रयत्न करणारे दोन दगड: राईचो आणि लेखक )
दुसर्या दिवशी राईचो लवकर उठून ब्रेकफास्ट करता धावपळ करीत होता. ब्रेडला कसलं तरी पिठ लाउन तळलं होतं आणि कॉफी. ती आम्ही ढोसली. मोबाईल फोनवर फोटो वैगेरे काढले, आणि फोन वरुनच इंटरनेटवर अपलोड केले. राईचो कुतुहलानी हा प्रकार पहात होता. मोबाईल वरून फोटो इंटरनेटवर जात आहेत ह्यावर त्याचा विश्वास बसला नाही, दिमित्रीला म्हणाला की काँम्युटर सुरू करून दाखव की खरच अपलोड झाले आहेत का? जातांना मी राईचोला म्हटलं की आय ऍम कॅरींग गुड मेमोरिज अबाऊट बुल्गारिया विथ मी. तर म्हणतो, "मी अजून २ महीने इथे आहे, परत ये, आय विल हेल्प यू कॅरी व्हेरीएशन ऑफ दोज मेमोरीज". दिमित्रीनी पुन्हा अनुवाद केला आणि पुन्हा एकदा उशीरा जोक कळल्यावर जश्या चेहर्यानी लेट करंट लोक असतात तसे आम्ही हसलो.
Monday, March 24, 2008
जो है सब जानत, वह कुछ नही है कहत; जो कछू नही जानत, वह कुछभी है बकत
आस्तीक आणि नास्तीक असे दोन प्रकारचे लोक असतात. आणि दोन्ही प्रकारचे लोक फार चांगले चांगले दृष्टांत देतात. चार चांगल्या गोष्टी सांगणार्या लोकांशी बोलणे मला कायमच आवडतं. पण कधी-मधी ते एकमेकांवर घसरतात; आस्तीक लोक, नास्तीक कसे बावळट आहेत; किंवा नास्तीक लोक, आस्तीक कसे अंधश्रद्ध आहेत ते सांगू लागतात. मग मला विषय संपवावा असे वाटू लागते. त्यांचे तोंड बंद करायची एक नामी युक्ती मला सापडली आहे जी मी तुम्हाला आज सांगणार आहे. खालील संवाद वाचा आणि काय समजायचयं ते समजा...
अंक पहीला:
आस्तीकः हे नास्तीक लोक ह्यांना कसली चाड नाही........ अमुक तमुक वैगेरे वैगेरे वैगेरे....
मी: खरं आहे तुझ. पण मला सांग, बुद्धीमान कोण आहे? जो सगळं समजून, उमजून, चिंतन, मनन करून देवाचं अस्तीत्व जाणून घेऊन देवावर विश्वास ठेवतो की जो ब्रॉडमाईंडेडनेस, लिबरलीजमच्या नावाखाली देवाचं अस्तीत्व नाकारतो ?
आस्तीकः आस्तीक माणूस बुद्धीमान आहे.
मी: झालं तर मग, बुद्धीमान माणसानी गप्प बसावं कारण "जो है सब जानत, वह कुछ नही है कहत; जो कछू नही जानत, वह कुछभी है बकत" वेड्यांना कधी तरी अक्कल येईल आणि त्यांचा देवावर विश्वास बसेल.
अंक दुसरा:
नास्तीकः हे आस्तीक लोक, अंधश्रद्धाळू, विचार करित नाहीत, जे पाहीलं नाही त्या देवावर विश्वास ठेवतात ........ अमुक तमुक वैगेरे वैगेरे वैगेरे....
मी: खरं आहे तुझ. पण मला सांग, बुद्धीमान कोण आहे? जो सगळं समजून, उमजून, चिंतन, मनन करून देवाचं नाही जाणून घेऊन देव नाही असं स्विकारतो, तो की जो धर्म, श्रद्धाळूपणा, भीती वैगेरेच्या नावाखाली देवाचं अस्तीत्व स्विकारतो ?
नास्तीकः नास्तीक माणूस बुद्धीमान आहे.
मी: झालं तर मग, बुद्धीमान माणसानी गप्प बसावं कारण "जो है सब जानत, वह कुछ नही है कहत; जो कछू नही जानत, वह है कुछभी बकत" वेड्यांना कधी तरी अक्कल येईल आणि त्यांचा देव नाही हे त्यांना कळेल.


